दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: एकीकडे राज्यात तीव्र दुष्काळ असताना राज्याच्या सत्तेतील एक महत्त्वाचा पक्ष खासदारांसह देवदर्शन आटोपून पावसाच्या तोंडावर दुष्काळ दौरा करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. या खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच कार्ल्याची एकवीरा देवी आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. हे दर्शन आटोपून येत्या ९ जून रोजी उद्धव ठाकरे राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मान्सून तोंडावर आला असताना आणि राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत असताना शिवसेनेचा हा दुष्काळी दौरा होणार आहे. यानंतर येत्या १६ जून रोजी उद्धव ठाकरे आपल्या सर्व खासदारांसह रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना होणार आहेत.
राज्यात दुष्काळ असतानाच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती, त्या कालावधीत आचारसंहितेची अडचण असल्याने सत्ताधारी दुष्काळ दौरा करू शकत नव्हते. तसेच सत्ताधारी पक्षांसह विरोधकही त्या काळात निवडणूक प्रचारात व्यस्त होते. निवडणूक आटोपल्यावर विरोधी पक्षांनी दुष्काळ दौरे केले, तर सरकारतर्फे पालकमंत्री दुष्काळ दौर्यावर होते. मात्र सत्ताधारी पक्षातील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना पावसाच्या तोंडावर दुष्काळ दौरे करणार आहे. या दुष्काळ दौर्यात शिवसेनेच खासदार बरोबर असणार नाहीत.