आपल्याला कोणी खोटं ठरवलं तर चालेल का? - उद्धव ठाकरे

शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्दयांना हात घातला.  

Updated: Oct 31, 2019, 03:49 PM IST
आपल्याला कोणी खोटं ठरवलं तर चालेल का? - उद्धव ठाकरे title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्दयांना हात घातला. आपल्याला जर कुणी खोटे ठरवत असेत तर तुम्हाला चालेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित आमदारांना विचारला. त्यावेळी सर्वांनी ठामपणे नकार दिला. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करायला नको, होते हेदेखील उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नमूद केले.  

दरम्यान, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते सर्व सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम विधिमंडळाचे शिवसेना गट नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आणि सहयोगी आमदार आज दुपारी राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेणार आहेत. शिवसेना भवन येथील बैठक संपवून सर्व आमदार थेट राजभवन येथे जाणार आहेत 

शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी युतीबाबत भाष्य केले. खूप काही अफवा सुरु आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मीडियाच्या माध्यमातून काही प्रस्ताव सुरु आहेत. आपण मित्रपक्षाला शत्रू मानत नाही. मात्र, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबर जे ठरले आहे, ते त्यांनी करावे. आम्ही स्थिर सरकार देऊ, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री मी होणार असे वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील बोलणी टळली. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेना नाराज झाली. त्यामुळे काल संध्याकाळी युतीच्या चर्चाबाबत बोलणी होणार होती, ती शिवसेनेकडून रद्द करण्यात आली. सत्तेतील जागा वाटपावरुन युतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याचीच चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे पाहा काय म्हणालेत?

- तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतोय
- खूप काही अफवा सुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका
- शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाहीय
- मीडियाच्या माध्यमातूम काही प्रस्ताव सुरु आहेत
- आपण मित्रपक्षाला शत्रू पक्ष मानत नाहीय
- माझं जे अमित शाहांबरोबर ठरलंय ते करावं. आम्ही स्थिर सरकार देऊ
- मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनऔपचारिक गप्पांमध्ये, असे वक्तव्य करायला नको होते
- मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिसकटली, पण मला खात्री आहे सगळं सुरळीत होईल