मुंबई : विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपाचा विकासाचा मुद्दा निवडणूक प्रचारातूनही गायब झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
गुजरात निवडणुक प्रचारातील पंतप्रधानांचे भाषण म्हणजे स्वतःच्याच राज्यात हमरीतुमरीवर येण्यासारखे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' तून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गुजरात निवडणूकीत भाजपामूळे प्रचाराची पातळी घसरली. महाराष्ट्रातील निवडणूकांमध्ये अफझलखान, शाईस्तेखान यांची उपमा एकमेकांना दिली गेली.
तर गुजरातच्या प्रचार सभांतून खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच ‘मुगल’ राजवट कबरीतून उकरून काढल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ज्या राज्याने देशाला ‘ताजा’ पंतप्रधान दिलाय त्या राज्यात खालच्या पातळीवर प्रचार करण्याची वेळ भाजपवर का यावी? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाने विकासाच्या मुद्द्यावर अनेक ठिकाणी सत्ता मिळवली आहे. गुजरातचा प्रचार हा विकासाच्या मुद्यावर होणे गरजेचे असताना पंतप्रधानांच्या भाषणांतून विकासाचा मुद्दा गायब झाला. पंतप्रधानही प्रचार सभांतून स्वतःच्याच राज्यात हमरीतुमरीवर आल्याचे उद्धव यांनी म्हटले.