उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, 13 राज्यातून ठरले 'नंबर वन'

राज्यातील विरोधी पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर आलेलं सर्वेक्षण

Updated: Jul 14, 2021, 10:19 PM IST
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, 13 राज्यातून ठरले 'नंबर वन'   title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेसाठी एक महत्वाची बातमी. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 'प्रश्नम' या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. 

प्रश्नम या संस्थेने देशातील 13 राज्य निवडली होती. यात हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. 13 राज्यात मिळून एकूण 17 हजार 500 जणांनी आपले मत नोंदवलं आहे. त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहेत.

'उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू' असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 49 टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी आहेत.

लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 60 टक्के लोकांनी मत दिलं असून ते पुन्हा मुख्यमंत्री नको असं मत नोंदवलं आहे. 

या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामचा समावेश नाही. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.