मुंबई : राजकारणात आरोप - प्रत्यारोप नवीन नाहीत. पण विकासकामांकडे दुर्लक्ष करुन केवळ राजकारणातच मशगुल असणाऱ्या राजकारण्यांना सामान्यांचे काही पडलंय का असा प्रश्न सातत्याने जाणवतोय. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे, आवाक्या बाहेरची गर्दी यामुळे सामान्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. या समस्यांना सामान्य व्यक्ती निमुटपणे तोंड देत आलाय. पण सहनशक्तीचीही काही सीमा असते.
मुंबईत सामान्यांच्या याच प्रश्नांचा कदाचित वाचा फोडण्याचे काम केल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या माहिम आणि सायन परिसरात सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आलेत. पण हे होर्डिंग कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच यामधून ते लावणाऱ्यांना नेमकं काय म्हणायचंय हे ही कळू शकलेले नाही.
सध्या हे होर्डिंग सामान्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.