मुंबई : उत्तर मुंबईत अभिनेत्री उर्मिलाचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कृप्त्या लढवत आहे. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिलाच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही लढत अगदीच एकतर्फी होईल असं वाटलं होतं. पण उर्मिलानं निवडणुकीच्या प्रचारात रंग भरायला सुरूवात केलीय. मराठी मतदारांशी जेव्हा ती संवाद साधते तेव्हा ती थेट कोकणाशी नातं सांगते. (मी सिंधुदुर्गची आहे) गुजराती मतदारांशी ती गुजराती खाद्यपदार्थांबाबत बोलते. (उंदियो ढोकळो, फापडो) कधी ती रिक्षा चालवून त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधतेय. कार्यकर्त्यांसोबत प्रचार करताना तिनं चक्क वडापावचा आस्वाद घेतला. आणि वडापावच्या चवीबाबत दादही दिली. पुन्हा त्यावर चटणी कुठं आहे हे ही विचारलं.
उर्मिला प्रचार करत असताना लहानग्यांची गर्दी जमली. मग काय या रंगिला गर्लनं चिमुरड्यांसाठी चक्क गाणं गायलं. उर्मिलानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराची मनोरंजक रणनीती आखलीय. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. त्यामुळे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींपुढे उर्मिला आव्हान निर्माण करू शकते अशी चर्चा आता रंगू लागली आहे.