मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात

सदाफुली, जास्वंद, सोनचाफा,झेंडू,तागरा, मोगरा अशा विविध फुलांचे बारा महिने वसईत शेती केली जात असून  छोटे मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात आहेत

Updated: Sep 20, 2020, 10:54 AM IST
मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात

मुंबई: गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे सेवा बंद असल्यामुळे वसईच्या शेकडो फुल शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दररोज सकाळी पहिल्या लोकलने वसईची फुले विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात दाखल होतात. मात्र, आता रेल्वेसेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना  फुले खाजगी वाहनाने मुंबईत न्यावी लागत आहेत. कामगारांचे पगार तसेच वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने वसईचा फुल शेतकरी संकटात सापडला आहे.

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

सदाफुली, जास्वंद, सोनचाफा,झेंडू,तागरा, मोगरा अशा विविध फुलांचे बारा महिने वसईत शेती केली जात असून  छोटे मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात आहेत. लॉकडाऊन मुळे फुले अनेक महिने झाडावरच कोमजली होती मात्र आता व्यवहार सुरळीत झाले असले तरी रेल्वेसेवा सुरळीत होण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शासनाने  नियम पाळून मालवाहतुकीसाठी फुल व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

याशिवाय, व्यवसायावर पोट असलेले कामगार यात भरडले जात आहेत. फुले मुंबईला गेली तरच आमचे पोट भरू शकते, अशी व्यथा या कामगारांनी मांडली आहे. सध्या  रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. इतर लोकांना बसने प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा ताण येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसेकडून मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासाठी सविनय कायदेभंग करण्यात येणार आहे. रेल्वे पोलिसांकडून आंदोलन न करण्याची नोटीसद्वारे सूचना देण्यात आली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.