...तर देशातील मजुरांचा उद्रेक होईल- प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. 

Updated: Apr 15, 2020, 04:13 PM IST
...तर देशातील मजुरांचा उद्रेक होईल- प्रकाश आंबेडकर title=

मुंबई: सरकारने योग्य ती खबरदारी घेतली नाही तर देशभरात वांद्रे येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. आता लॉकडाऊनला विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. वांद्रे (मुंबई) येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण होते. लॉकडाऊन वाढविल्याने आपल्यावर उपासमारीची पाळी येईल, असे कामगारांना वाटले. त्यामुळे या कामगारांनी विरोध दर्शविला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉकडाऊनला विरोध केला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा पुरेसा असूनही त्याचे मोफत वाटप झालेले नाही. त्यामुळे वांद्र्यात उद्रेक पाहायला मिळाला. त्यामुळे आता शासनाने योग्य ते पाऊल उचलली नाहीतर तर त्याचा उद्रेक देशभर होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. 

मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दिमतीला OLA कॅब्स

सरकारकडे मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांना दोन महिन्याचे धान्य मोफत वाटावे, अशी विनंती आम्ही यापूर्वीच केली होती. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले. 
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरेही ओढले. शासनाने कृती करण्याऐवजी २१ दिवसांमध्ये करोना कसा थांबवला याचंच गुणगान करण्यात सरकार मश्गुल आहे.परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना काय सुविधा, मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, सरकारने आता जागे व्हायला हवे. अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभरात होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; राज्यात ११७ नवे कोरोना रुग्ण