आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : दारुसाठी पैसे, बसण्याठी खुर्ची देण्यास नकार देणाऱ्या सुरक्षा रक्षकासोबत (security guard) वाद घालत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना डोंबिवलीत (Dombivali Crime) घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हल्ल्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. पोलिसांनी (Dombivali Crime) याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. शुल्लक कारणावरुन आरोपीने सुरक्षा रक्षकाला दगड आणि प्लास्टिकच्या कॅरेटने जबर मारहाण केली आहे.
डोंबिवली पश्चिम येथील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील दुकानात काम करणाऱ्या एका वृद्ध सुरक्षा रक्षकाला तिथल्याच एका दारुड्याने डोक्यात दगड घालून मारहाण केली आहे. आरोपीने सुरक्षा रक्षकावर हल्ला करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी हर्षद शाम कुशाळकर या आरोपीला अटक केली आहे. तर मुन्नीराम सहानी असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नीराम हे पटेल आर मार्टच्या समोरील शास्त्रीनगर रुग्णालया समोर येथे गुरुवारी पहाटे गस्त घालत होते. ते पाऊस आल्याने ते रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये जाऊन बसले. त्याचवेळी आरोपी हर्षद दारू पिऊन तिथून चालला होता. त्याने मुन्नीराम यांना दारू पिण्यासाठी पैसे देण्याची मागणी केली. तसेच त्यांची खुर्ची बसण्यासाठी मागितली.
Video | दारुसाठी पैसे न दिल्याने सेक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला दगड,घटना सिसिटीव्हीत कैद#CCTVvideo #Dombivali #marathinews #zee24taas pic.twitter.com/ugNvwZLW1l
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 14, 2023
त्यानंतर मुन्नीराम यांनी हर्षदला तिथून जाण्यास सांगितले. हर्षदला त्याचा राग आला आणि त्याने तिथे पडलेल्या दगडांनी मुन्नीराम यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. हर्षदने पेव्हर ब्लॉक उचलून तो मुन्नीराम यांच्या अंगावर फेकला. त्यानंतर मोठा दगड त्यांच्या डोक्यात मारला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर हर्षद तेथून निघून गेला. या हल्ल्यात मुन्नीराम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुन्नीराम यांचे नातेवाईक राजू सहानी यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हर्षदला अटक केली आहे