प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : आजपर्यंत आपण पोलीस (Police) आरोपींना प्रशासनाने पुरवलेल्या वाहनांमधून नेत असल्याचे पाहत आलो आहोत. पण विरारमध्ये (Virar News) पोलिसांनी आरोपींना त्यांच्याच गाडीतून नेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांच्या या कृत्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. विरारच्या अर्नाळा सागरी पोलिसांनी (Arnala Marine Police) एका प्रकरणातील आरोपींना चक्क त्यांच्याच गाडीचा वापर केल्याचे समोर आल्याने नवा वाद सुरु झाला आहे.
विरारच्या अर्नाळा सागरी पोलिसांनी बोगस कॉल सेंटरच्या आरोपींना न्यायालयात नेण्यासाठी एका खासगी बसचा वापर केल्याचे उघड झाले आहे. मारहाण, बेकायदेशीर मद्या विक्री प्रकरणातील आरोपी असलेल्या क्षिजीज रिसॉर्ट मालकाजवळील बसचा पोलिसांनी वापर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अर्नाळा पोलिसांच्या या कृतीमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्नाळा पोलिसांनी आरोपीच्या बसचा वापर केल्याने पोलिसांकडे दुसरे वाहन नव्हते का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
अर्नाळा सागरी पोलिसांनी नुकत्याच एका बोगस कॉल सेंटरवर कारवाई करून 49 जणांना अटक केली आहे. सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या आरोपींना न्यायालयात ने-आण करण्यासाठी पोलिसांनी वादग्रस्त रिसॉर्ट चालकाच्या बसचा वापर केला आहे. राजोडी येथील क्षितीज रिसॉर्टच्या मालकीची ही बस असल्याचे समोर आले आहे. या रिसॉर्टचा मालक एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून त्याच्या कॅफेतून बेकायदेशीर मद्य विक्रीप्रकरणी आणि ग्राहकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
असे विविध आरोप असलेल्या वादग्रस्त रिसॉर्टचालकाची बस आरोपींची ने-आण करण्यासाठी वापरणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या आरोपींना नेण्यासाठी पालिकेच्या परिवहन सेवेची बस किंवा एसटी सहज उपलब्ध असतानाही एका आरोपीच्याच खासगी बसचा वापर केल्याने अर्नाळा सागरी पोलीस वादात सापडले आहेत.