पार्ल्यातील पहिलं ‘व्हर्च्युअल एक्झिबिशन’ होणार १६ ऑगस्टला

 महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी विलेपार्ले वुमन्स नेटवर्कचा अनोखा उपक्रम

Updated: Aug 14, 2020, 03:07 PM IST
पार्ल्यातील पहिलं ‘व्हर्च्युअल एक्झिबिशन’ होणार १६ ऑगस्टला title=

मुंबई- जगात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. कोरोनामुळे एकूणच जगाची कार्यशैली बदलली आहे. याचा प्रत्यय पार्लेकरांनी दिला आहे ते आभासी प्रदर्शनाचे आयोजन करुन. विलेपार्ले वुमन्स नेटवर्क या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. रविवार, १६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान ‘झूम’ ऍपवर हे ‘व्हर्च्युअल पॉप-अप एक्झिबिशन’ होणार आहे. कोणतीही व्यक्ती विनामूल्य या आभासी प्रदर्शनास भेट देऊ शकते. “पार्ल्यातील महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि ग्राहकांना योग्य उत्पादन घरबसल्या पाहता यावे हा या आभासी प्रदर्शनाचा उद्देश आहे, अशाप्रकारचे हे मुंबईतील पहिलेच आभासी प्रदर्शन असावे” असे आयोजक रसिका जोशी-फेणे यांचे मत आहे.  

कोरोनाच्या काळात गणरायासाठी बाजारपेठेत जाऊन खरेदी करणे जोखमीचे झाले आहे. त्यामुळे ग्राहक बाजारात जाण्यास अनुत्सुक आहेत. तर ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने विक्रेते आणि लघुउद्योजक त्रस्त आहे. ग्राहक आणि विक्रेते यांना एकाच मंचावर आणण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आभासी ग्राहकपेठेचे आयोजन केले जाणार आहे. या आभासी प्रदर्शनात २० महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत. प्रत्येक उद्योजिकेस आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यास ५ ते ७ मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. 

या आभासी प्रदर्शनात गृहोत्पादक केक्स, लाडू ब्राऊनीज, गुलाबजाम आणि मोतीचूर लाडूंसाठी बरण्या, सिरामिक पॉट्स, ट्रे, डायरीज, हाताने तयार केलेले साबण आदी वस्तूंच्या दालनाचा या प्रदर्शनात सहभाग असेल. त्याचप्रमाणे गणपती स्पेशल उकडीचे मोदक, गणपती पेपर डेकोरेशन, रंगीबेरंगी दिवे, नऊवारी साड्या, उपरणे आदी गणेशोत्सवासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहेत. सोबतच शेतातील ताज्या भाज्या, सेंद्रीय गूळ, मध, गृहोत्पादक तूप, श्रीखंड, गृहोत्पादक च्यवनप्राश आदी तयार करणाऱ्या महिलांचा समूह देखील या आभासी प्रदर्शनाशी निगडीत आहे. या आभासी प्रदर्शनास थेट ओमान, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ते अगदी पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून लोक भेट देणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रसिका जोशी-फेणे, रिद्धी नाईक (९८२०१ ६३८४५), शुभांगी चोणकर (९८२०२ ८२३११), देबराती रॉय (९९२०३ ६०८०६), पूजा सावंत (९८६०५ ०१५८९), कविता गर्ग आणि कौमुदी पासण्णा विशेष परिश्रम घेत आहेत. हे आभासी प्रदर्शन विनामूल्य असून प्रदर्शनास भेट देण्याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. पूर्वनोंदणीसाठी उपरोक्त क्रमांकावर संपर्क साधावा.