मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादी

Mumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.    

शिवराज यादव | Updated: May 6, 2024, 08:30 PM IST
मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादी title=

Mumbai Water Cut: मुंबईत सध्या अनेक ठिकाणांना पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात आधीच घामाच्या धारा लागल्या असताना दुसरीकडे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर येथील वॉटर फिल्टरेशन प्लांटचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाड झाल्यानंतर तासाभरता पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी स्त्रोत उभारण्यात आला होता. पण त्यानंतर काही भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये चर्चगेट, मरीन ड्राइव्ह, कफ परेड, वरळी, माहीम, माटुंगा आणि दादर या भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये मंगळवारपर्यंत पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात केली जाणार आहे. यामुलळे येथील रहिवाशांना पाणीकपात सहन करावी लागेल. 

याशिवाय, डोंगरी, भेंडी बाजार, सँडहर्स्ट रोडसह सायन, भायखळा, अँटॉप हिल आणि परळ सारख्या भागातही पाणीकपात केली जाणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या भागांमधील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात केली जाणार आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनुसार, संपूर्ण पश्चिम उपनगरातील (वांद्रे ते दहिसर) पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात केली जाईल, तर पूर्व उपनगरात (भायखळा ते मुलुंड) 20 टक्के पाणीकपात होईल. पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्र हा 100 एमएलडी क्षमतेचा आहे. सध्या सात तलावांमधून येणारे पाणी फिल्टर करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे. या सुविधेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.