सावरकर म्हणजे दैवत, कोणतीही तडजोड नाही- संजय राऊत

स्वातंत्र्यासाठी नेहरू, गांधी यांच्याप्रमाणे सावरकरांनीही जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान झालाच पाहिजे.

Updated: Dec 14, 2019, 06:06 PM IST
सावरकर म्हणजे दैवत, कोणतीही तडजोड नाही- संजय राऊत title=

मुंबई: राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उपरोधिकपणे उल्लेख केल्याने महाविकासआघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सावरकर यांच्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, अशा इशाराच दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. स्वातंत्र्यासाठी नेहरू, गांधी यांच्याप्रमाणे सावरकरांनीही जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान झालाच पाहिजे. इथे तडजोड होणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता राज्यातील काँग्रेस नेते राऊतांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'माफी मागायला मी काही राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे'

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत 'रेप इन इंडिया' अशी टिप्पणी केल्यामुळे राहुल गांधी यांनी वाढ ओढावून घेतला होता. या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत शुक्रवारी भाजपने लोकसभा दणाणून सोडली होती. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील रामलीला मैदानावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपला चांगले फटकारले. मात्र, यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उपरोधिकपणे उल्लेख केला. एखादी सत्य गोष्ट बोलण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता. 

त्यामुळे आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत असलेल्या फरकामुळे ते एकत्र कसे नांदणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, आम्ही किमान समान कार्यक्रमाच्याआधारे सर्वकाही निभावून नेऊ, असे शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि अन्य मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमनेसामने येताना दिसले होते.