'उत्तम' लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल

पाहा कशी दिसतेय ही नवी लोकल....   

Updated: Nov 6, 2019, 08:36 AM IST
'उत्तम' लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल सेवेत आता एका नव्या सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. असंख्य प्रवाशांची गर्दी असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या सेवेत आता एक नवी लोकल प्रवाशांच्या सेवेत हजर झाली आहे.

त्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले उत्तम असे रेक लोकलचे डबे प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या ६९व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत 'Uttam rake' ही लोकल रुळांवर धावली. 

रोजच्या लोकल गाड्यांच्या तुलनेत या रेल्वेमध्ये काही अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन बटण, बदललेली आणि आरामदायी बैठकव्यवस्था, उभं राहिल्यानंतर पकडण्यासाठीचे हँडल या सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. ्

चर्चगेट आणि विरार या मार्गावर ही लेडिज स्पेशल लोकल धावणार आहे. मंगळवारी सायंकाळी ६.१३ मिनिटांनी या लोकलने चर्चगेटवरुन निघत तिचा पहिला प्रवास केला. पश्चिम रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली.

अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे. कॅमेरा असणारी ही पहिली बिगर वातानुकुलित लोकल आहे. प्रथम श्रेणी डब्यामध्ये सीसीटीव्हीसोबतच बैठकव्यवस्थेमध्ये काही बदल झाल्याचंही पाहायला मिळेल. दारापाशी असणाऱ्या विभागजकाच्या निर्मितीसाठी स्टीलऐवजी फायबरचा वापर करण्यात आला आहे. या लोकलमध्ये सामान ठेवण्यासाठीची जागासुद्धा अधिक रुंद ठेवण्यात आली आहे. द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये खिडक्या बंद करण्यासाठी 'ड्युअल लॉक'ची सुविधा देण्यात आली आहे. वीजबचत करणारे पंखे, एलईडी दिवे योसोबतच ट्रेमध्ये आपत्कालीन साखळीऐवजी लाल रंगाचे बटण देण्यात आले आहे. या लोकलमध्ये काही कर्तृत्त्ववान महिलांची आणि सोबतच मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांची छायाचित्र लावत ती अधिक सुशोभित करण्यात आली आहे.