मुंबई: ट्रेनच्या दरवाजात उभे राहून दादागिरी करणाऱ्या प्रवाशांना यापुढे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बोरिवली ते विरार दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने डोअर ब्लॉकिंग ड्राईव्ह चालवला आहे. त्यासाठी तीन टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. लोकलच्या डब्यात साध्या वेषातील पोलीस जवान दादागिरी करणाऱ्यांचे चित्रीकरण करतील.
हे चित्रीकरण तातडीने पुढच्या स्थानकातल्या आपल्या सहकाऱ्याला हे जवान पाठवतील. त्यानंतर पुढील स्थानकावरील पोलीस लगेच दारात उभे राहून दादागिरी करणाऱ्यांना तिथेच पकडतील.
गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी तब्बल ६९ प्रवाशांवर कारवाई केली आहे. गाडीत चढताना उतरताना कोणी धक्का मारला किंवा वाद घालणाऱ्यांच्या मुसक्या लगेच आवळल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात उद्दाम प्रवाशांच्या दादागिरीला चाप बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.