ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्रनं महाराष्ट्राला बरीच स्वप्नं दाखवली आहेत. येत्या दहा वर्षात अवघ्या महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकेल, अशा घसघशीत गुंतवणुकीचे करार या माध्यमातून झालेत. पाहुया मॅग्नेटिक महाराष्ट्र, महाराष्ट्राला नेमकं काय देणार आहे.
उद्योग क्षेत्रातल्या या कुंभमेळ्यात बड्याबड्या उद्योगपतींनी महाराष्ट्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्यात. रिलायन्स पुढच्या दहा वर्षांत तब्बल साठ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहे. देशातला पहिला डिजिटल इंडस्ट्रिअल एरिया उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये रिलायन्सबरोबर सीमेन्स, सिस्को, डेल, एचपी, नोकियासारख्या प्रतिष्ठित कंपन्या पार्टनर असणार आहेत. या डिजिटल इंडस्ट्रिअल एरियामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स या सगळ्याशी संबंधित प्रकल्प असणार आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत महिंद्रा ग्रुप पाचशे कोटींची गुंतवणूक असलेलं ई व्हेहिकल युनिट महाराष्ट्रात स्थापन करणार आहे. कांदिवलीत बॉलीवूडवर आधारित थीम पार्क उभारण्याचंही महिंद्रा ग्रुपनं ठरवलंय. १७०० कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. तसंच नागपूरच्या ग्रीन पार्कमध्ये महिंद्रा ग्रुप १२५ कोटी गुंतवणार आहे. त्यातून दोन हजार रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
पुढच्या दहा वर्षांच्या काळात हे सगळं महाराष्ट्रात दिसेल, अशी अपेक्षा आहे. यानिमित्तानं महाराष्ट्राच्या मातीत गुंतवणुकीच्या रुपानं चांगला पैसा येईल, भूमीपुत्रांना रोजगार मिळेल आणि पर्यायानं महाराष्ट्राचा ख-या अर्थानं विकास होईल... अशी अपेक्षा आहे....