कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला कोणाकडे बघण्याची किंवा कोणाच्या मदतीसाठी धावून जाण्यासाठी वेळ नाही. माणसातली माणुसकी लोप पावत आहे. पण ठाण्यात चक्क एक माणूस माकडाच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यावर माणुसकीचं दर्शन घडतं.
येऊरच्या कम्पाऊण्ड वॉलवर माकडीण आणि तिचं छोटं पिल्लू बसले होते. पण माकडीणीचा तोल गेल्यामुळे ती खाली पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा हे छोटं पिल्लू आपल्या आईला कवटाळून बसलं होतं. त्याक्षणी दुसरी माकडं त्या पिल्लाला आपल्यासोबत जंगलात घेवून जाण्यासाठी तयार नव्हते.
तेव्हा त्याला सांभाळ्यासाठी त्याचं पालन पोषक करण्यासाठी प्राणीप्रेमी मानसी नथवाणी पुढे आल्या. फक्त पाच दिवसांच्या माकडाच्या पिल्लाला त्या त्यांच्या घरी घेवून आल्या आहेत. घरी ते माकडाचं पिल्लू एका टेडीबेअरला बिलगून बसलं.
त्याला वाटतंय कदाचित हीच आपली आई आहे. मानसी नथवाणी त्या माकडाला पोटच्या पोरासारखं जपत आहेत. शिवाय हा अनुभव खूप चांगला आसल्याचं देखील त्या सांगत आहेत. तर हे माकडाचं छोटं पिल्लू सहा-आठ महिन्यांचं झाल्यानंतर त्याला एखाद्या जंगलात किंवा मंकी पार्कमध्ये सोडण्यात येईल.
त्या माकडाच्या पिल्लाला सांभाळण्यासाठी पुढे आलेल्या मानसी नथवाणी यांचे कौतुक होत आहे. माणसाच्या माणुसकीचा हा उत्तम दाखला आहे.