मुंबई : नवनीत कौर राणा (Navneet Rana) अमरावतीच्या अपक्ष लोकसभा खासदार 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पाठिंब्यावर निवडून आल्या. त्यामुळं त्यांनी खरं तर महाविकास आघाडीच्या गोटात असायला हवं होतं. पण राणा दाम्पत्यानं महाविकास आघाडी सरकारवर तोफा डागायला सुरूवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तर त्यांच्या निशाण्यावरच आहेत. या संघर्षाची बीजं रोवली गेली ती २०१४ सालीच.
अपक्ष आमदार रवी राणांशी (Ravi Rana) विवाह केल्यानंतर 2014 मध्ये नवनीत कौर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचं पहिलं टार्गेट होतं आनंदराव अडसूळ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नवनीत राणांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये मात्र राणांनी अडसूळांना अस्मान दाखवलं. त्याआधीपासूनच राणा विरुद्ध सेना खटके उडू लागले होते.
17 मार्च 2014 - नवनीत राणांनी अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार केली
30 जुलै 2018 - मुंबईच्या सिटी को-ऑप बँकेत अडसूळांनी 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रवी राणांनी केला. अडसूळांच्या तक्रारीनंतर रवी राणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
3 ऑगस्ट 2018 - अडसूळांनी १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नवनीत राणांनी गुन्हा दाखल केला.
15 नोव्हेंबर 2020 - ऐन दिवाळीत शेतक-यांच्या प्रश्नांसाठी मातोश्रीवर धडक देण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. त्यावेळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
13 फेब्रुवारी 2021 - अॅसिड हल्ला करून ठार मारू, अशी धमकी देणारं पत्र नवनीत राणांच्या दिल्लीच्या घरी पाठवण्यात आलं. या धमकीमागे संजय राऊत आणि अडसूळ असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता
24 मार्च 2021 - शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणांनी केला. महाराष्ट्रात तू कशी फिरते तेच बघतो, असं सावंतांनी धमकावल्याचा आरोप त्यांनी केला.
8 जून 2021 - अडसूळांनी दाखल केलेल्या खटल्यात मुंबई हायकोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. सुप्रीम कोर्टानं या आदेशाला स्थगिती दिली.
16 जानेवारी 2022 - परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानं राणा दाम्पत्याला राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं
पुतळा वादानंतर राणांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली. या प्रकरणात रवी राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा वाद संपत नाही तोच हनुमान चालिसा वाद उफाळून आला. राणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आणि पुढचं महाभारत घडलं.