कोरोना लसीबाबत का वाढलाय संभ्रम?

लस टोचून घेण्याबाबत जनतेच्या मनात अजूनही भीती 

Updated: Jan 22, 2021, 05:59 PM IST
कोरोना लसीबाबत का वाढलाय संभ्रम?

मुंबई : कोरोनावर गुणकारक ठरणारी लस आली. मात्र ही लस टोचून घेण्याबाबत जनतेच्या मनात अजूनही भीती आहे. त्यामुळंच लसीकरण मोहिमेला कमी प्रतिसाद मिळतोय. जनता लस घ्यायला का घाबरते आहे. कोरोनाची लस बनवण्यात भारतीय संशोधकांना यश आलं. मोठा गाजावाजा करत भारतात लसीकरण मोहीम सुरूही झाली. पहिल्या टप्प्यात ३० कोटी कोरोना वॉरियर्सना लस देण्याचं उद्दिष्ट आखण्यात आलं. मात्र लस टोचून घेण्याबाबत अगदी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातही भीती आणि संभ्रम आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कोरोना लसीकरणाचं प्रमाण कमी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. लोक ऐनवेळी लस घेण्याचा निर्णय बदलतात, असं ते म्हणाले. जगभरातल्या सत्ताधाऱ्यांनी लस टोचून घेतली. पण भारतात मात्र अजूनही मंत्री, नेते, राजकारणी मंडळींनी लस टोचून घेतलेली नाही. त्यामुळं लसीबाबत शंकाकुशंका काढल्या जात आहेत. 

देशातही लस टोचून घेण्याबाबत भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. लसीबाबत भीती बाळगू नका, लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, असं आवाहन त्यांनी केलं.

कोरोनावर कधी एकदा लस येते, असं सगळ्यांना झालं होतं. आता लस आलीय, पण लसीबाबतचा संभ्रम दूर करण्यात सरकार आणि आरोग्य यंत्रणा कमी पडते आहे. कोरोना लस सुरक्षित आहे, हे जनतेच्या मनावर बिंबवण्याची आता गरज आहे.