कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत आता कबुतरखान्यांवरुन राजकारण जोरात रंगलंय. परंतु या गोष्टीकडं राजकारणाच्या पलिकडं जावून विचार करायला हवा. अनेक ठिकाणी भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे दिसून आलंय. त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने अयोग्य असले त्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळं याला वेगळं वळण लागलंय.
स्थानिकांना श्वसनाचे आजार होत असल्यानं दादर येथील कबुतरखाना बंद करण्याची मागणी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केल्यानंतर या मागणीला विरोध करण्यासाठी भाजपचे आमदार राज पुरोहित सरसावले. कबुतरखान्यावरून असं राजकारण रंगलं असलं तरी कबुतरखाने खरंच मानवी आरोग्याच्यादृष्टीने अपायकारक आहेत का? हे पाहणंही महत्वाचं आहे.
भारतात एकूण लोकसंख्येपैकी ८ ते १० टक्के लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होतायत. यातील १० टक्के लोकांना दमा, अस्थमा हा कबुतरांमुळे होतो. कबुतरांची विष्टा आणि पिसे यासाठी कारणीभूत ठरतायत. वाळलेल्या विष्टेतून अँस्परजिलस फंगस निर्माण होवून अँलर्जी आणि दम्याचा त्रास होतो. बंद जागेत जर कबुतरांची विष्टा बरेच दिवस राहिल्यास त्यातून अमोनिया गँस निर्माण होवून श्वसनाचे आजार होतात. तसंच कबुतराच्या बॉडीतील सीरम विष्टेतून बाहेर पडून हायपर सेन्सिटीव्हीटी न्यूमोनायटृेस आजार होवून दम लागणे, खोकला, थकवा निर्माण होतो, असं दमा व अस्थमा तज्ज्ञ डॉ सितेश रॉय यांनी म्हटलंय.
एक कबुतराची जोडी वर्षाला ४८ पिलांना जन्म देते. त्यामुळं वर्षोनुवर्षे कबुतरांची संख्या मुंबईत प्रचंड प्रमाणात वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी खाद्यातून ओविस्टॉप हे औषध दिल्यास त्यांची प्रजनन क्षमता थांबते. हा प्रयोग स्पेनमध्ये केला जातोय. असाच प्रयोग मुंबईतही राबवल्यास नक्कीच कबुतरांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
कबुतरखान्यांवरून राजकारण करण्याऐवजी यातून मार्ग काढणं अधिक गरजेचे आहे. कारण राजकारणातून राजकीय पक्षांचा हेतू साध्य होत असला तरी मूळ समस्या मात्र तशीच राहते.