कृष्णात पाटील, मुंबई : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर मंत्री अनिल परब यांची माहिती भाजपनेते किरिट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा संजय कदम यांनी केला होता. त्यासंबधी ऑडिओ क्लिप त्यांनी जारी केली होती. हे प्रकरण समोर येताच शिवसेनेत खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेत रामदास कदम ऑडिओ क्लिप प्रकरणी नाराजी आहे. तसेच कदम यांच्यावर पक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे.
रामदास कदम हे शिवसेनेचे मोठे नेते तसेच माजी मंत्री आहेत. त्यांच्यावर झालेल्या या आरोपांमुळे शिवसेनेत त्यांच्याविषयी नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाने कदम यांच्यावर कारवाई केल्यास, यापुढे असं कृत्य करणाऱ्या नेत्यांवर जरब बसेल. त्यामुळे कदम यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याची शिवसेनेत जोरदार चर्चा आहे.
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गिते यांनी देखील महाविकास आघाडीला अडचणीत आणणारे विधान केले होते. त्यामुळे अनंत गिते यांना देखील संयम पाळण्याचा सल्ला पक्षाकडून दिला जाण्याची शक्यता आहे.
कदम यांच्या ऑडिओ क्लिपने पक्ष बदनाम होत असल्याची शिवसेना नेत्यांची भावना आहे. त्यामुळे खरंच शिवसेना रामदास कदम आणि अनंत गिते यांच्यावर कारवाई करते का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.