दारु विकणाऱ्या बाईचा मुलगा अभ्यास करायचा, दारुडे म्हणायचे, ''चखणा आण, तू काय कलेक्टर होणार हाय?''

मुलगा फाटक्या कपड्यांनी जिल्हा परिषद शाळेत जायचा. ती म्हणते आम्ही उपाशीही राहायचो. शिळ्या भाकरी खायचो..

Updated: Jun 23, 2021, 02:53 PM IST
दारु विकणाऱ्या बाईचा मुलगा अभ्यास करायचा, दारुडे म्हणायचे, ''चखणा आण, तू काय कलेक्टर होणार हाय?''

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : गरीबी वाईट असते, असं म्हणतात. गरीबीत गरीबांच्या मुलांची एवढी दशा होते की, जग कोणत्या दिशेने जात आहे, हे सांगायला त्यांना कुणीच वाली आजूबाजूला दिसत नाही. गरीबी त्यांना पांरपरीक व्यवसायात अडकून बसवते. कष्ट करुनही गरीबीतच त्यांचं आयुष्य जातं. पण शिक्षणाचा प्रकाश एवढा तीव्र असतो, एवढा उर्जा देणारा आणि योग्य दिशा दाखवणारा असतो की, तुम्ही विचारच करु शकत नाही. ती वाईट गरीबी कशी साथ सोडून गेली आणि समाजात वावरताना हवा असणारा आत्मसन्मान कधी सतत सोबत चालत आला.

कलेक्टर होण्याची प्रेरणादायी सत्य कथा

अशीच एका सत्य घटनेवर आधारीत कहाणी आहे, एका आदिवासी मुलाची, त्याची आई मुलाचे हे किस्से तिच्या बोली भाषेत भरभरुन सांगते, कारण त्यांची परिस्थितीच तशी होती आणि कायापालटही तसाच झाला. तुमच्यापुढे कोणतीही परिस्थिती असेल, तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्थरातून आले असाल, तरी देखील ही कहाणी तुमच्यासाटी प्रेरणादायी आहे.

दारु विकणं आणि झोपडीत राहणं

भिल्ल ही आदिवासी जमात आहे. शेतकऱ्यांकडे मजुरी करणे, पक्षांची शिकार करणे असं ते तर करतात. पण दारु बनवणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय समजला जातो. भिल्ल समाज आजही एवढा गरीब आहे की त्यांच्यातील बहुतांश लोकांच्या नशिबात झोपडीतलं जगणं आहे. आज हातात किती पैसे आले, त्यावर उद्याचा त्यांचा दिवस कसा जाईल हे ठरलेलं असतं. 

bharud

मुलगा पोटात असताना नवरा गेला

एका आदिवासी महिला आपल्या झोपडीत मुलासह राहायची. उदारनिर्वाहासाठी दारु विकणे हा त्यांचा व्यवसाय नाही, तर उद्याचं पोटं भरण्याचं एक साधन. या महिलेचा नवरा वारला, तेव्हा ती गर्भवती होती, गर्भपात करण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव होता. पण तिच्या बहिणीने तिला साथ दिली, तिच्या २ मुलांना आपल्या घरी आसरा दिला.

शिळ्या भाकरी नाहीतर उपवास

ही महिला तिच्या बहिणीच्या गावी धुळे जिल्ह्यातील सामोडे गावात राहायला आली. तिचा एक मुलगा फाटक्या कपड्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत होता. शाळेत त्याची प्रगती चांगली असल्याचं शिक्षक त्याच्या घरी येऊन सहजच बोलून जात होते.

पण पोटाची खडगी कशी भरायची, या चिंतेत असलेल्या महिलेला यातलं फारसं काही कळत नव्हतं. ती म्हणते आम्ही उपाशीही राहायचो. थंड म्हणजे शिळ्या भाकरी खायचो, दारुविक्रीतून दिवसात ५० ते १०० रुपयेच यायचे, पण त्यालाही खर्च होता.

 

त्याला अस्वच्छ राहायला आवडलं नाही

भिलाटी म्हणजे भिल्ल समाजाची वस्ती. तर भिलाटीतली मुलं शाळेत पूर्ण पोहचत नव्हती, मध्येच शाळेला दांडी देत होती, पण हा मुलगा नियमित शाळेत यायचा आणि अभ्यासात हुशार असल्याचं दिसून आलं. त्याला अस्वच्छ राहायला कधीच आवडायचं नाही, कपडेही तो स्वच्छ धुवायचा.

दारु पिणाऱ्यांची मैफल आणि त्यांच्या बाजूला अभ्यास

शिक्षकांना या मुलाचं विशेष कौतुक असायचं, कारण हा एका झोपडीसारख्या घरात राहणारा आणि त्यातंही दारु विकण्याचा व्यवसाय असल्याने, दारु पिणाऱ्यांची मैफल आणि त्या बाजूला मन लावून अभ्यास करणारा हा मुलगा. विचार करा एखाद्या बिअरबारच्या गोंगाटात, कानावर दारुड्यांच्या शिव्या येत असताना, अशा परिस्थितीत हा मुलगा कसा वाढला असेल.

तुझा मुलगा एवढा अभ्यास करुन काय कलेक्टर होणार आहे?

या मुलाची आई झोपडीत राहणारी दारु विकणारी बाई, त्यावेळी या मुलाचा अभ्यास सुरुच असायचा, मुलाच्या हातात पुस्तक पाहून दारुडे मुलाला म्हणायचे, ''ये पोरा, दुकानावर जा आणि चखणा घेऊन ये'', त्याच्या आईलाही म्हणायचे, ''तुझ्या मुलाला दुकानावरुन चखणा आणायला सांग''. पण ती महिला म्हणत असे, ''नाही, तो चखणा आणणार नाही, तुमचं तुम्ही पाहा''. 

तेव्हा दारु पिणारे गिऱ्हाईक, सहज त्या दारु विकणाऱ्या महिलेला बोलून जायचे, ''एवढा अभ्यास करतो तुझा मुलगा? तुझा मुलगा एवढा अभ्यास करुन काय कलेक्टर होणार आहे?''

आज नंदूरबार जिल्ह्याचा कलेक्टर

पण या मुलाने  भविष्याला अशी कलाटणी दिली की, ७ जानेवारी १९८८ रोजी जन्मलेल्या हा राजेंद्र भारुड नावाचा मुलगा आज नंदूरबार जिल्ह्याचा कलेक्टर आहे.

तिला एवढंच माहित होतं, तिचा मुलगा काहीतरी होणार आहे

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना आईने दारु विकली, पण चखणा आणायला मुलाला कधीच पाठवलं नाही, कारण घरी जेव्हा शिक्षक येत आणि त्यांच्या अभ्यास - हुशारीचं कौतुक करत, तेव्हा तिला हे माहित नव्हतं की, तिचा मुलगा कलेक्टर होणार आहे...तिला एवढंच माहित होतं, तिचा मुलगा काहीतरी होणार आहे.

''मी एक स्वप्न पाहिलं'', हे पुस्तक लिहिलं

आदिवासी भिल्ल समाजातून आयएएस झालेल्या डॉ. राजेंद्र भारुड यांनी, ''मी एक स्वप्न पाहिलं'', हे पुस्तक लिहिलं आहे. सध्या हे पुस्तक तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

आपल्या शिक्षकांच्या इच्छेने वैद्यकीय शिक्षण

डॉ. राजेंद्र भारुड यांनी बारावीत प्रवेश घेतला, इंजीनिअरिंगला जाण्याऐवजी त्यांना त्याच्या शिक्षकांनी सल्ला दिला. तू डॉक्टर हो, समाजाचा याला फायदा होईल. डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे त्यांच्या देवरे सरांनी इच्छा व्यक्त केली. भारुड यांनी जीएस मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. २०१२ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. शिक्षणाचं महत्त्व आणि परिस्थितीची जाणीव यातून त्यांनी हे मोठं यश मिळवलं.