वरळी विधानसभा मतदारसंघाला शिवसैनिकांच्या 'गडाचं' स्वरुप

युवराजांच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्यांची मोठी फौज

Updated: Oct 16, 2019, 10:40 PM IST
वरळी विधानसभा मतदारसंघाला शिवसैनिकांच्या 'गडाचं' स्वरुप

दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं वरळी विधानसभा मतदारसंघाला शिवसैनिकांच्या 'गडाचं' स्वरुप आलं आहे. युवराजांच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्यांची मोठी फौजच वरळीत तळ ठोकून बसली आहे. आदित्य ठाकरेंच्या दिग्विजयासाठी अख्खी शिवसेना कामाला लागली आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेचे बडे-बडे नेते वरळीत तंबू ठोकून आहेत.

विद्यमान आमदार सुनील शिंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी आमदार सचिन अहिर, नगरसेवक आशिष चेंबूरकर, नगरसेवक अमेय घोले, युवा सेना सरचिटणीस अमोल किर्तीकर यांच्यासह ७ शाखा प्रमुख, १७ उपशाखा प्रमुख, १ विभागप्रमुख, प्रत्येक शाखेअंतर्गत अधिकृत १५० पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक असा फौजफाटा रात्रंदिवस राबतो आहे. आदित्य ठाकरे भरघोस मतांनी विजयी व्हावेत, याची जबाबदारी या सगळ्यांवर आहे.

आदित्य ठाकरेंच्या सभा, प्रचार रॅली, बाईक रॅली आयोजित केल्या जात आहेत. मराठी मतदार ही शिवसेनेची वोट बँक असली तरी आता गुजराती, तेलगु, मुस्लीम वोट बँकेसाठी त्यांच्या प्रादेशिक भाषेतले बॅनर्स, पत्रकं वाटण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे एका बाजूला लुंगी घालून प्रचार करतायत तर दुस-या बाजूला मुस्लीम, ख्रिश्चन भागावरही खास लक्ष दिलं जातं आहे. सचिन अहिर यांची वोट बँक शिवसेनेकडे वळावी यासाठी सचिन अहिर यांचे कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.

केवळ प्रचारच नव्हे तर व्यवस्थापन समितीही तयार करण्यात आली आहे. शिवाय, आयटी सेलकडेही लक्ष देण्यात येतं आहे. त्याची जबाबदारी युवा सेना पदाधिका-यांकडे आहे. 
 
खरं तर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंसमोर कुणीही तगडा उमेदवार दिसत नाहीत. पण शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला ऐतिहासिक मताधिक्यानं निवडून देण्यासाठी शिवसैनिक कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत.

एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसेनेचा प्रचार करत आहेत. तर दूस-या बाजूला शिवसेनेच्या नेत्यांची मोठी फौज आदित्य ठाकरेंसाठी वरळीच प्रचार करते आहे. त्यामुळे गड आणि सिंह दोन्ही राखण्यासाठी शिवसैनिकांचे प्रयत्न सुरु आहेत.