मुंबई : मध्यंतरी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांनी डोकेवर काढलेय. चेंबूर जवळील देवनार येथील एका बोगस डॉक्टरामुळे तरुणाचा मृत्यू झाला. चुकीचे इंजेक्शन दिल्याने या तरुणाचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दरम्यान, या बोगस डॉक्टरकडे कसलाही वैद्यकीय अनुभव नसताना राजरोजपणे तो नागरिकांच्या जीवाशी खेळत होता. त्याचा मागील अनेक वर्षांपासून देवनारमध्ये दवाखाना सुरुच होता. या बोगस डॉक्टरने दिलेल्या इजेक्शनच्या दुष्परिणामामुळे एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या तथाकथीत डॉक्टराचे बिंग फुटले. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
देवनार परिसरात शाहबाज आलम मोहम्मद हारून सिद्दिकी तथा शेख याचा अनेक वर्षांपासून दवाखाना सुरु होता. तो नागरिकांच्या जीवाशी खेळत होता. या शेखकडे कोणतेही वैद्यकीय पदवी नसल्याचे तपासात उघड झालेय.
या बोगस डॉक्टरने प्रदीप जाधव (२५) या तरुणावर उपचार केले होते. मात्र, उपचाराने त्याची तब्येत काही दिवसांपासून अधिकच खालावली. त्याला इंजेक्शन दिल्यानंतर त्याची बाधा झाली. त्याची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला.
प्रदीपच्या पोस्टमॉर्टेममध्ये इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेय. त्यानंतर रुग्णालयाने देवनार पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रदीप हा उपचारासाठी शेख यांच्याकडे गेल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांने दिलेल्या इंजेक्शनमुळे प्रकृती अधिक बिघडल्याचे पुढे आलेय. त्यानंतर पोलिसांनी शेख याची चौकशी केली. त्याच्याकडे कोणतीही पदवी नसताना तो डॉक्टर दाखवून एक स्वत:चे क्लिनिक चालवत होता.