जयंती वाघधरे, www.24taas.com, मुंबई
मराठी कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा झी गौरव पुरस्कार नुकताच मुंबईत पार पडला यावेळी या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘बालगंधर्व’ सिनेमासाठी सुबोध भावेला गौरविण्यात आलं, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ‘प्रतिबिंब’ सिनेमासाठी सन्मानित करण्यात आलं. ‘शाळा’ हा या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला.
व्यावसायिक नाटकात ‘लग्नबंबाळ’ नाटकाने सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट नाटक असे तीन पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नंदिता धुरीला पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं, तर ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर आणि राजदत्त यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
अजय-अतुल ही संगीतकार जोडी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारची मानकरी ठरली. तर सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचा सलोचनादिदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सलोचना दिदींचा सत्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठी तारांगणातील लखलखत्या ताऱ्यांच्या सन्मानाने हा सोहळा उत्तरोत्तर असाच रंगत गेला.