www.24taas.com, मुंबई
देशभरात वादळी ठरलेल्या जोधपूरच्या भंवरी देवीच्या अपहरणाचं कोडं अद्याप सुटलेलं नाही. पण, भंवरी देवी प्रकरणावर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. बॉलिवूडचे निर्माते- दिग्दर्शक महेंद्र धाडीवाल हे भंवरी देवी अपहरण प्रकरणातील घडामोडीवर पहिल्यापासून लक्ष ठेऊन होते. आता या सेक्स आणि मर्डर मिस्ट्री असणाऱ्या घटनेला रुपेरी पडद्यावर आणायला ते उत्सुक झाले आहेत. धाडीवाल यांनी यापूर्वी ‘माँ तुझे सलाम’ या सिनेमाची निर्मिती केली होती.
बुधवारी धाडीवाल यांनी आपण भंवरी देवीच्या जीवनावर सिनेमा बनवत असल्याची घोषणा केली. या सिनेमात भंवरी देवीची भूमिका बिपाशा बासूने करावी अशी धाडीवाल यांची इच्छा आहे. त्यामुळे जर बिपाशाने मनावर घेतलं तर भंवरी देवी मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत होऊ शकते. धाडीवाल यांनी हा सिनेमा आपल्या नावावर रजिस्टरही करून घेतला आहे.
भंवरी देवी ही जोधपूर जवळील एका खेड्यात नर्स म्हणून काम करत होती. सप्टेंबरमध्ये अचानक ती बेपत्ता झाली. या प्रकरणात बरेच मोठे राजकीय नेते अडकले असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे.