संजय गुप्ताला 'हटके' प्रमोशन पडलं महागात

भलती कल्पकता ‘शूट आऊट अॅट वडाळा’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या अंगाशी आली आहे. निमंत्रण पत्रिकेत पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर केल्यानं संजय गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Mar 1, 2012, 12:52 PM IST

दिनेश मौर्य, www.24taas.com, मुंबई

 

भलती कल्पकता ‘शूट आऊट अॅट वडाळा’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या अंगाशी आली आहे. निमंत्रण पत्रिकेत पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर केल्यानं संजय गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 'शूट ऑऊट अॅट वडाळा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी संजयनं हटके प्रमोशनचा भाग म्हणून मीडियासाठी एक निमंत्रण पत्रिका छापली होती. या निमंत्रण पत्रिकेत पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तातडीन दखल घेत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

सिनेमाचं प्रमोशन दणक्यात करणं, किंवा प्रमोशनसाठी हटके स्ट्रॅटेजी वापरणं हे बॉलिवूडसाठी काही नवीन नाही. मात्र, सिनेमाच्या पत्रकार परिषदेचं आमंत्रणही पोलिस कमिशनरच्या ऑफीसमधून आलेल्या पत्रासारखं बनवून त्यात पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. ‘शूटआऊट अॅट वडाळा’ या सिनेमाच्या क्रिएटिव्ह टीमने केलेला हा सारा खटाटोप केला होता. हटके प्रमोशन करणं हे आजवर आपण अनेक सिनेमांच्यामाध्यमातून पाहिलंय. मात्र, अशाप्रकारे सिनेमाचं प्रमोशन पहिल्यांदाच करण्यात आलं होतं.

 

पोलिस कमिशनरच्या ऑफिसमधून या प्रकरणाची दखल घेतली गेली. अशाप्रकारे पोलिसांच्या हुद्द्याचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणी तातडीन दखल घेत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.