अण्णा हजारेंना रविवारी पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. अण्णांना प्रचंड थकवा आणि छातीतल्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. अण्णांचे वयोमान आणि कमी झालेली प्रतिकार शक्ती यामुळे त्यांच्यी उपोषण करण्याची क्षमता संपुष्टात आल्याची शक्यता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. के.एच.संचेती यांनी व्यक्त केली आहे. अण्णांनी त्यांची ढासळलेली प्रकृती आणि वाढत्या वयोमानामुळे यापुढे उपोषण करु नये आणि भविष्यात त्यांनी ते टाळावं असा सल्ला मी देणार असल्याचं डॉ.संचेती म्हणाले.
उपोषणाच्या आधी आहार कमी करणं आणि त्यानंतर पूर्ण अन्न त्याग करणं आणि परत अन्न सेवनाचे प्रमाण थोडं थोडं वाढवत नेणं यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. उपोषणाचा त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. अण्णांना मुंबईतील उपोषणाच्या दरम्यान संसर्गामुळे ताप आला होता आणि त्यामुळे त्यांना दोन दिवसात उपोषण सोडावे लागलं होतं. अण्णांची नाजूक प्रकृती लक्षात घेता पुढील रणनिती निश्चित करण्यासाठी बोलावलेली टीम अण्णांची बैठक रद्द करण्यात आल्याचं सुरेश पठारे म्हणाले.