आरबीआयच्या घोषणा: टीकावू की दिखाऊ

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठी सूट देण्यात आली. शेअर बाजाराने मात्र या बदलांना नकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर रुपयाचीही घसरण झालेली दिसून आली.

Updated: Jun 26, 2012, 08:25 AM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठी सूट देण्यात आली. शेअर बाजाराने मात्र या बदलांना नकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर रुपयाचीही घसरण झालेली दिसून आली.

प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून सुचवलेल्या अखेरच्या उपायांची घोषणा सोमवारी रिझर्व बँकेनं केली. सातत्यानं घसरत चाललेल्या रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी आरबीआयनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आबेत. यात परकीय गुंतवणूक संस्थांसाठीची भारतातील गुंतवणुकीची मर्यादा दोन हजार कोटींपर्यंत वाढवण्यात आलीय. केंद्र सरकारच्या पतमर्यादेत वाढ करण्यासाठी १००० डॉलरपर्यंतचं कर्ज घेऊन त्याचं भारतात वितरण करण्याची मुभा सरकारला देण्यात आलीय. परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी आता भारतीय कंपन्यांना त्यांनी कमावलेलं परकीय चलन कर्जफेडीसाठी वापरता येणार आहे. त्याचबरोबर सरकारी बॉन्डमधील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादेत ५०० कोटी डॉलर्सची  वाढ करण्यात आलीय. पायाभूत विकास प्रकल्पांमधील परकीय गुंतवणुकीला चालना देण्याचं सुतोवाचही आरबीआयनं केलंय. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी या घोषणा जनतेसमोर मांडल्या.

या घोषणांनंतर लगेचच शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. वाढत्या आर्थिक संकटाचं गांभिर्य पाहता, या उपाययोजना अगदीच तोकड्या असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती प्रचंड घसरल्या असताना देशातल्या पेट्रोलच्या किंमती का कमी केल्या जात नाहीत, या प्रश्नाचं उत्तर कुणालाच मिळालेलं नाही. त्यामुळं आरबीआयनं केलेल्या या घोषणा टिकाऊ कमी आणि दिखाऊ जास्त असल्याचं बोललं जातंय.

.