उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं काही खरं नाही....

काँग्रेस खासदार विजय बहुगुणा यांचा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला असला तरी काँग्रेसच्या 17 आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला

Updated: Mar 13, 2012, 05:51 PM IST

www.24taas.com, डेहराडून


काँग्रेस खासदार विजय बहुगुणा यांचा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला असला तरी काँग्रेसच्या 17 आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. केंद्रिय मंत्री हरिष रावत यांना समर्थन देत 17 आमदार शपथविधीला गैरहजर राहिले. उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीवरुन काँग्रेसमधल्या गटबाजीला उधाण आलं आणि पक्षाचे वरिष्ठ नेते हरक सिंग रावत यांनी हरिष रावत यांच्या नावाला पसंती दर्शवली.

 

उत्तराखंडच्या नव्या सरकारचे भवितव्य अंधकारमय असल्याचं आणि ते केवळ 10-15 दिवसच टिकेल असं हरक सिंग रावत म्हणाले. हरिष रावत यांनी काँग्रेसला उत्तराखंडमध्ये नवसंजीवनी दिली पण बहुगुणा यांनी राज्याला कोणत्याही प्रकारचे योगदान दिलेलं नाही. बहुगुणा हे आमच्यावर लादण्यात आले आहेत असं हरक सिंग रावत यांनी सांगितलं. हरक सिंग रावत रुद्रप्रयागमधून निवडून आले आहेत.

 

हरक सिंग रावत यांनी हरिष रावत यांना दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे कारण ते स्वत: मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत. पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित कताना निवडून आलेल्या आमदारांच्या नावांचा विचार करायला हवा होता असं हरक सिंग रावत म्हणाले. पण जर खासदारांमधून निवड करायची झाल्यास हरिष सिंग यांचा पहिला हक्क असल्याचंही त्यांनी सांगितलं.