उपराष्ट्रपती हमीद अन्सारीच?

विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या गळ्यात पुन्हा उपराष्ट्रपती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने हमीद अन्सारी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Updated: Jul 9, 2012, 04:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या गळ्यात  पुन्हा उपराष्ट्रपती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.  संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने  हमीद अन्सारी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

अन्सारी हे या पदासाठी यूपीएकडून प्रमुख दावेदार असणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आली.  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी जनता दल (सेक्यूलर)चे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून अन्सारी यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. तसेच पंतप्रधान डाव्या पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, देवेगौडा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की अन्सारी यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा दर्शविला आहे.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने अन्सारी यांचा विजय निश्चित मानण्यात येत आहे. यूपीएकडून राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी मिळण्यापूर्वी हमीद अन्सारी यांचे नाव चर्चेत होते. मात्र, मुखर्जी यांना उमेदवारी दिल्याने आता अन्सारी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.  एनडीएने  उपराष्ट्रपती पदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.