www.24taas.com, नवी दिल्ली
एअर इंडियाच्या पायलट्सचा संप आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील 20 फ्लाईट्स आज रद्द करण्यात आल्या आहेत.
दिल्ली हाय कोर्टानं संपावर गेलेल्या पायलट्सना संप मागे घेण्याचा आणि कामावर रूजू होण्याचा इशारा दिला होता. मात्र, हायकोर्टाच्या या इशाऱ्याला न जुमानता मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागं घेणार नसल्याचा निर्णय घेतलाय. पायलट्स आपल्या निर्णयावर ठाम असल्याने मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेणारी सुमारे 12 आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती दिल्ली एअरपोर्टच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
फ्रँकफर्ट, शांघाय, टोरांटो, न्यू जर्सी, शिकागो, सेऊल, या देशांना जाणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसलाय. बुधवारी 26 पायलट्सवर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे आत्तापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या पायलट्सची संख्या 36 वर पोहोचली आहे. एका बाजुला पायलट्स आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी पायलट्सना बोलणी करण्यासाठी आवाहन केलं आहे. मात्र या संपाचा मोठा फटका हा प्रवाशांना बसतोय यात शंका नाही.