पेट्रोल दरवाढीवर भडका उडालेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या मागणीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळले असून सध्या वाढलेल्या किंमती मागे घेण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची आज बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दरवाढीवर चर्चा करण्यात आली. मात्र, सध्याचे वाढलेले दर कमी होणार नसल्याचे पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले.
मात्र, यापुढे किंमती वाढविण्यापूर्वी सरकारमधील सहकारी पक्षांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. दरम्यान, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसची प्रस्तावित दरवाढ ही पुढे ढकलण्यात आल्याचेही माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधानांसमोर डीझेल आणि रॉकेलच्या दरवाढीबद्दल पंतप्रधानाकडे विरोध नोंदविला असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बैठकीनंतर सांगितले.
पेट्रोल दरवाढी संदर्भात आम्ही पंतप्रधानांकडे चिंता व्यक्त केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची दरवाढ सहन करण्यात येणार नसल्याचे तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले.यापुढे अशा प्रकारे दरवाढ झाली तर आम्हांला विचार करावा लागेल असेही पंतप्रधानांना सांगितल्याचे बंदोपाध्याय यांनी सांगितले.