मोदी-पवार नव्या राजकीय समीकरणाचे संकेत

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी लवासाला अचानक दिलेली भेट. तसचं लवासाचे प्रवर्तक हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनीला (एचसीसी) गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Updated: Mar 22, 2012, 09:29 PM IST

www.24taas.com, मुंबई  

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी लवासाला अचानक दिलेली भेट. तसचं लवासाचे प्रवर्तक हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनीला (एचसीसी) गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

प्रदेश भाजपने लवासाला विधीमंडळात आणि बाहेरही मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. आता नरेंद्र मोदींनी लवासाला भेट दिल्यामुळे विरोधाची भूमिका कायम ठेवायची का याबाबत भाजप संभ्रमात आहे. मोदींच्या भेटीचा आणखी एक पैलु म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात नवी राजकीय समीकरणं आकाराला येत असल्याचे हे संकेत आहेत. शरद पवारच लवासा प्रकल्पाचे जनक आहेत. मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी पवारांच्या कृषी धोरणाबद्दल गौरवोदगार काढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी पवारांच्या कृषी धोरणाची प्रशंसा केली होती. गेल्या आठवड्यात मोदी यांनी कोणताही गाजावाजा न करता लवासाला भेट दिली आणि जवळपास २४ तास तिथे राहून प्रकल्पाच्या विविध स्थळांना भेट दिली.

 

लवासाचे प्रवक्ते यांना नरेंद्र मोदींच्या भेटीविषयी विचारलं असता ते म्हणाले की याआधीच गुजरात सरकारबरोबर हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनीने सामंजस्य करार केला आहे. गुजरातमधलं ढोलेरा प्रकल्प एचसीसी राबवत आहे त्यामुळे भेटीमागे विशेष कारण नाही. मोदींना लवासा प्रकल्पामुळे झालेला विकास आवडल्यामुळे त्यांनी आता साबरमती नदीच्या विकासाचा प्रकल्प एचसीसीने राबवावा असं सूचवलं आहे.

 

पण मोदींनी प्रकल्पाची केलेल्या प्रशंसेने प्रदेश भाजपला मात्र चिंतेने ग्रासलं आहे हे नक्की. भाजपच्या पुणे शहर शाखेने लवासाच्य विरोधात नुकतीच निर्दशनं केली होती. पुण्यातील पाणीटंचाईला लवासा जबाबदार असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.