राहुल गांधीच्या ‘घर के सामने’ सचिनचा बंगला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर आता तो दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून सचिनला देण्यात येणारा बंगला हा राहुल गांधीच्या बंगल्यासमोरच असणार आहे, त्यामुळे सचिन- राहुल शेजारी होणार असल्याची चर्चा सध्या दिल्लीत आहे.

Updated: Jun 7, 2012, 05:52 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली  
मास्टर ब्लास्टर सचिन  तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर आता तो दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून सचिनला देण्यात येणारा बंगला हा राहुल गांधीच्या बंगल्यासमोरच असणार आहे, त्यामुळे सचिन- राहुल शेजारी होणार असल्याची चर्चा सध्या दिल्लीत आहे.

 

.
सचिनला देण्यात येणारा तुघलक लेनमधील हा ५ नंबरचा बंगला सात हजार स्कवेअर फूटमध्ये बांधण्यात आला आहे.  या बंगल्यात एक मोठा बगीचा आहे. तर विश्रांतीसाठी बंगल्यात सात बेडरूमही आहेत. सचिनचे कीर्ति आणि कर्तुत्व मोठे असल्याने त्याला सुरक्षाही तशीच देणे आवश्यक आहे. त्यामुळेच सचिनला विशेष अशी झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. या बंगल्याची सुरक्षा एजन्सीमार्फत पाहणी करण्यात येणार आहे.

 

.
दोन दिवसापूर्वीच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणा-या सचिनला खासदार म्हणून दिल्लीत बंगला देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सचिनला तुघलक लेनमधील ५ नंबरचा बंगला देण्यात येणार आहे. याच लेनमधील १२ नंबरचा बंगला राहुल गांधी यांचा आहे. सचिनला देण्यात येणारा हा ५ नंबरचा बंगला भाजपाचे नेते साहिब सिंग वर्मा यांना देण्यात आला होता. मात्र वर्मा यांच्या अपघाती मृत्यूनंतर हा बंगला वर्मांचे नातेवाईक आणि माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा यांना देण्यात आला होता. एप्रिल महिन्यात विक्रम वर्मा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर हा बंगला रिकामा असल्याने आता हा बंगला सहा वर्षाच्या कालावधीसाठी सचिनला देण्यात येणार आहे.

 

.
तर सचिन बरोबरच राज्यसभेच्या नामनियुक्त सदस्य झालेल्या रेखा यांनी खासदारांना देण्यात येणारा बहुमजली इमारतीतील फ्लॅट कार्यालयापासून लांब असल्याचे सांगत नाकारल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था राजधानीतील उच्चब्रू समजल्या जाणा-या कस्तुरबा गांधी मार्गावरील बलवंत राय मेहता लेनमधील बंगला क्रमांक १५ मध्ये केली जाण्याची शक्यता आहे. तर सरकार अनु आगा यांना खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीतील फ्लॅट देण्याच्या विचारात आहे.