www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वे आधुनिकीकरणासाठी पंतप्रधानांचे सल्लागार सॅम पित्रोडा यांच्या अध्यक्षेतखाली नेमण्यात आलेल्या कमिटीने रेल्वे भाड्यात एका वेळेस २५ टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस केली आहे. तसंच रेल्वेचे भाडे चलनवाढीच्या दराशी निगडीत असावं अशीही शिफारस केली आहे.
आर्थिक आरिष्टाचा सामना करणाऱ्या भारतीय रेल्वेला त्यामुळे नवसंजीवनी मिळेल तसंच पुढच्या वर्षी ६०,००० कोटी रुपयांची उभारणी करणं शक्य होईल.
रेल्वेचा २०१२-१३ च्या अर्थसंकल्पाच्या आधी कमिटीने ६०,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीची शिफारस केली आहे. रेल्वे पुढील पाच वर्षात ९,१३,००० कोटी रुपयांचा आधुनिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेणार आहे त्यासाठी या निधीची वापर करता येईल.
नियोजन आयोगाला केलेल्या सादरीकरणात पित्रोडांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पॅनेलने २५ टक्के भाडेवाढीमुळे रेल्वेला ३७,५०० कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न प्राप्त होईल असं म्हटलं आहे. तसंच चलनवाढीशी निगडीत मालवाहतूकीची भाडेवाढ केल्यास आणखी २५,००० कोटी रुपयांची उत्पन्नात भर पडेल. रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि ममता बॅनर्जींचा रेल्वे भाडेवाढ करण्यास तीव्र विरोध आहे.