वनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात

औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.

Updated: Jun 19, 2012, 01:46 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद 

 

औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचा-यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.

 

रविवारी सगळीकडे ‘फादर्स डे’ उत्साहात साजरा केला जात असताना गौताळा अभयारण्यात मात्र आपल्या ‘फादर’च्या मंत्रिपदाचा फायदा उचलत युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी एक भव्य असा ‘युवा सन्मान सोहळा’ आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पुरणवाडीच्या वन खात्याच्या विश्रामगृहात खास मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणारेच वनाधिकारी युवा नेत्यांच्या खातिरदारीत गुंतले होते.  कायद्यानुसार अभयारण्यात अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नाहीत. मात्र, वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मुलाचा कार्यक्रम असल्यानं फक्त मेळाव्याचीच नाही तर मांसाहारी जेवण तयार करण्याचीही मुभा देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे अभयारण्यात चुली पेटवण्यात आल्या, लाऊडस्पीकरवर सुद्धा मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली, एकाच वेळी शंभरपेक्षा जास्त वाहने अभयारण्यात नेण्यात आली. वनमंत्र्यांचा मुलगाच आयोजक असल्यानं आक्षेप तर कोण घेणार म्हणा.

 

या सर्व प्रकाराबाबत विश्वजीत कदमांनी मात्र कानावर हात ठेवलेत. असं काही घडलंच नसल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे कायदा तोडल्याचे माहिती असतानाही वनाधिका-यांनी मात्र याप्रकरणी चुप्पी साधलीय. वारंवार पाठपुरावा करुनही वनाधिकारी याविषयी बोलण्यास तयार नाहीत. तसंच याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही. सामान्यांच्या हातून अशी काही चूक झाली असती तर वनखात्याकडून तात्काळ कडक कारवाई करण्यात आली असती. इथं मात्र खुद्द वनमंत्र्यांचाच मुलगा नियम तोडणारा असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक वनखातं दाखवणार का?  असा प्रश्न विचारला जातोय.

 

.