www.24taas.com, औरंगाबाद
काँग्रेस हायकमांड आपल्यावर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. दिल्लीत आपण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी तातडीनं मुंबईत येणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हायकमांडच्या नाराजीच्या वृत्ताच खापर त्यांनी माध्यमांवर फोडलं. मात्र सोनिया गांधींच्या भेटीवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार होते. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नव्हतं.
मतदार संघातली कामं होत नसल्याचा आरोप करत आमदारांनी दिल्लीत जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडल्याची चर्चा होती. त्यातच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीनं मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला दणका दिला होता. त्यामुळं हायकमांडनं आमदारांची नाराजी गांभीर्यानं घेतली असल्याचं बोललं जातं आहे. अधिवेशन काळातही बैठका घेत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर धावाधाव करत मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते.