ठाणे ग्रामीण भागात पाण्यासाठी दाही दिशा

मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Updated: Apr 11, 2012, 10:09 AM IST

www.24taas.com, ठाणे

 

 

मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

 

 

 

डोंगरवाटांतून पाण्याचे हंडे एकमेकांवर रचून कसरत करत चाललेल्या आदिवासी महिला.. उन्हाच्या काहिलीत एक-दोन नव्हे तब्ब्ल 15-15 किलोमीटरची वणवण...तळ गाठलेल्या विहिरी..उन्हाळा सुरु झाल्यापासून शहापूर तालुक्यातल्या पाड्या-पाड्यांवरच्या महिला आणि पुरुषांचा हा दिनक्रम आहे.. 50 कुटुंब असलेल्या पेढ्याचा पाडा या आदिवासी पाड्यावर तर परिस्थिती अजूनच बिकट आहे.. तळाला गेलेल्या विहिरीत पाणी भरण्याची दररोज पाड्यावरच्या एका घराची पाळी आहे..हे पाणी कसं पुरणारं हा त्यांचा सवाल आहे.

 

 

 

तालुक्यात 195 नळयोजना मंजूर आहेत, मात्र त्यातल्या 10 ते 15 योजनाच सुरु  आहेत. शिरोळे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी 45 लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती.. पाईप गेल्या दोन वर्षांपासून गावात पडून आहेत.. ठेकेदारानं 70 टक्के रक्कम उचललीये.. मात्र पाण्याचा अजूनही पत्ताच नाहीये.. अभ्यास सोडून गावातल्या मुलींना पाण्याची वणवण तेवढी नशिबी आली आहे. मुंबई शहराची तहान याच तालुक्यातून भागवली जातेय..भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोडक सागर या 5 धरणांमुळे, धरणांचा तालुका अशी शहापूरची ओळख आहे.

 

 

 

पाणी धरणातं दिसतय..मात्र ते वापरण्याचा अधिकार मात्र तलुक्याला नाही. ही पाण्यासाठीची परवड भीषण आहे.. यातून शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न वाढतायेत.. मुंबईत राहत नसली तरी ही माणसंचं आहेत.. ही संवेदनाच विरुन गेलीय. पाण्यासाठी अपार कष्ट करणा-या महिलांच्या सहनशक्तीचा सरकार अंत पाहतय.. ढिम्म निगरगट्ट प्रशासनाकडून हा प्रश्न सुटण्याची धूसर शक्यताही दिसत नाहीये.. अजून 60 दिवस तरी 5-5 हंडे डोक्यावर ठेऊन हीच उरापोटी धावपळ हेच या ग्रामस्थांचं नशिबी आहे.