तहसीलदारावरील हल्ल्याचे राज्यभर पडसाद

रायगड जिल्ह्यात रोह्याच्या तहसीलदारांवर पिस्तुल रोखल्याचे पडसाद संपूर्ण कोकणात उमटू लागले आहेत. या घटनेमुळं ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Updated: Apr 3, 2012, 10:33 AM IST

www.24taas.com, रायगड

 

रायगड जिल्ह्यात रोह्याच्या तहसीलदारांवर पिस्तुल रोखल्याचे पडसाद संपूर्ण कोकणात उमटू लागले आहेत. या घटनेमुळं ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये  संतापाची लाट पसरली आहे.

 

घटनेचा निषेध म्हणून कर्मचारी ‘कामबंद आंदोलन’ करणार आहेत. तर राज्यातले कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहेत. या घटनेमुळं कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षतिततेची भावना निर्माण झाली असल्यानं निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत असल्याचं कोकण विभाग महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आलंय.

 

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याची माहिती रोहा तहसीलदार गणेश सांगळेंना मिळाल्यानंतर ते आरे खूर्द येथे पाहणी करण्यासाठी रात्री दहा वाजता पोहचले होते. या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन परब आणि मनोज शिंदे हे दोघे तिथे आले. या दोघांनी तहसीलदार सांगळे यांची गाडी अडवून शिवीगाळ करत त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 

अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या तहसीलदारांवर पिस्तुल रोखणारा राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष नितीन परब अजूनही मोकाटच आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून ४८ तास उलटले तरीही त्याला अटक करण्यात आलेली नाही.