चंद्रशेखर भुयार, www.24taas.com, उल्हासनगर
उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. ठेकेदाराने ही पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील सुमारे १०० कोटींचे सिमेंटचे रस्ते खोदले असल्याचे उघडकीस आलंय. त्यामुळे शिक्षक आमदार रामनाथ मोतेंनी संबंधित ठेकेदार आणि महापालिकाविरोधात पोलिसांत तक्रार केली असून हे प्रकरण येत्या पावसाळी अधिवेशनात लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितलंय.
उल्हासनगर महानगरपालिका म्हणजे ‘आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते’ अशी अवस्था झाली आहे. शहरात जेएनआरयुएम अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी 160 कोटींची जलयोजना राबवण्यात येत आहे. यासाठी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. मात्र यासाठी शहरातील 100 कोटी खर्चून बांधलेले शहरातील निम्याहून अधिक सिमेंट काँक्रीटचे रस्ते खोदण्यात आलेत. वर्ष आणि सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते खोदण्यात येत असल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातांचे प्रमाणही वाढलंय. याविरोधात शिक्षक आमदार रामनाथ मोतेंनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.
दुसरीकडं महापालिका योजनेचे महत्व सांगून रस्ते खोदण्याचे समर्थन करीत आहे. शहरातील रस्ते अरुंद असून, पाणी पुरवठा योजना महत्वाची आहे. लवकरच सर्व रस्ते पूर्ववत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिलंय. रस्ता दुरुस्तीसाठी पुन्हा कोट्यवधींची टेंडर्स निघतील, रस्ते पूर्ववत होतील. परंतु कोट्यावधी रुपये खर्चून काही दिवसांपूर्वीच बनवलेले रस्ते का खोदण्यात आले आणि जर रस्ते खोदले जाणार होते तर हे रस्ते का बनविण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाकडे नाहीत.