मदिरा मित्रानों सावधान....

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं पनवेलमध्ये सव्वा लाख किंमतीचा दारुचा साठा जप्त केला. या साठ्यात देशी-विदेशी दारुचा साठा तसंच अनेक नामांकीत कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या.

Updated: Dec 9, 2011, 12:40 PM IST

झी २४ तास वेब टीम, पनवेल

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं पनवेलमध्ये सव्वा लाख किंमतीचा दारुचा साठा जप्त केला. या साठ्यात देशी-विदेशी दारुचा साठा तसंच अनेक नामांकीत कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. पनवेल तालुक्यातल्या शिरटोन पाडा इथं एका झेन कारमध्ये हा साठा ठेवण्यात आला होता.

 

३१ डिसेंबर आणि महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सध्या दारूची मागणी वाढते आहे. याचाच फायदा घेऊन काही भेसळखोरांनी दारूमध्ये भेसळ करण्याचा धंदा सुरू केला. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी छापा टाकून कारवाई केली.

 

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या अनेक दारूच्या बाटल्यांमध्ये भेसळयुक्त दारू विकण्याच्या प्रयत्नात ही टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी दारू वाहतूक करणाऱ्या भगवान पाटील, विलास मुंबईकर, भास्कर पाटील, परशुराम पाटील या चार आरोपींना अटक करण्यात आली.