झी २४ तास वेब टीम, कोकण
आता राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांच्या तसंच वहिवाटीच्या जमिनी आता लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला लाभलेल्या लांबच लांब समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छीमारांच्या जमिनी अजूनही सरकारने त्यांच्या नावावर केलेल्या नाही. आजपर्यंत फक्त त्यांची घरच त्यांच्या नावावर आहेत. आता सरकारने त्यांना दिलासा दिला आहे. मच्छिमारांच्या जमिनी लवकरच त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा कोकण आयुक्तांना दिले आहेत.
हा निर्णय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे या दर्याच्या राजाला त्याची हक्काची जमीन जरी मिळणार असली तरी सध्या ही कारवाई कागदावरच आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या जमिनी नावावर कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.