मुंब्र्याच्या प्रश्नावर आघाडी नेत्यांची उडाली भंबेरी

ठाण्यात आघाडीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा भागाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर नेत्यांची भंबेरी उडाली. मुंब्रा भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचं शरद पवारांनी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार ? या गुगलीनं नेते गांगरून गेले.

Updated: Feb 9, 2012, 08:35 AM IST

कपिल राऊत, www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यात आघाडीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा भागाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर नेत्यांची भंबेरी उडाली. मुंब्रा भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचं शरद पवारांनी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार ? या गुगलीनं नेते गांगरून गेले. परिणामी बॅकफूटवर गेलेल्या जितेंद्र आव्हाडांना मुंब्र्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा काढणार असल्याची घोषणा करावी लागली.

 

ठाण्यात आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यानंतर नेत्यांनी मोठमोठी आश्वासनं द्यायला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे विकासाचा पाढा वाचत होते. मात्र मुंब्रा भागाचा जाहीरनाम्यात उल्लेख नसल्याची बाब समोर आल्यानंतर नेत्यांची पार भंबेरी उडाली. इतकंच नव्हे तर खुद्द शरद पवारांनी दोन वर्षांपूर्वी दिलेलं, औद्योगिक वसाहतीचं आश्वासनही अजून हवेतच असल्याचंही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिलं. यावर उत्तर देताना अजित पवार अडचणीत आले.

 

नेते बॅकफूटवर गेल्यानं जितेंद्र आव्हाडांना सूत्रं हाती घेऊन सारवासारव केली. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं राजकीय पक्षांनी किती गांभीर्यानं घेतलेली असतात, हेच या घटनेतून सिद्ध होतं. त्यामुळं मुंब्रा भागासाठीचा प्रसिद्ध होणारा जाहीरनामाही किती अंमलात येईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहतो.