कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटी बसला टार्गेट केलं आहे.
बुलढाणा, यवतमाळ आणि अकोल्यात काल शेतकरी रस्त्यावर उतरले होते. बुलढाणा जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. संतप्त आंदोलकांनी एसटी बसच्या काचा फोडल्या.तर त्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिखलीत नागपूर-पुणे हाय़वेवर रास्तारोको केला होता.
यवतमाळमध्ये कापूस उत्पादक शेतक-यांनी रास्तारोको केला. जिल्ह्यात शेतकरी आणि ग्राहक संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नागपूर-तुळजापूर रस्त्यावर आंदोलकांनी काही काळ वाहतूक अडवून धरली होती. कापसाला सहा हजार रुपये हमीभाव मिळावा अशी आग्रही मागणी शेतक-यांनी केली.
पोलिसांनी ५० हून जास्त आंदोलकांना अटक केली. तर अकोल्यातही मनसेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.