कोट्यावधीची सुपारी... ती पण वाघांसाठी

एकीकडे चंद्रपूर जिल्हयातील २५ वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात शिकारी टोळ्यांना कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली जाण्याची चर्चा असतानाच चंद्रपुरात पुन्हा एका वाघाची शिकार झाली आहे.

Updated: May 18, 2012, 09:48 PM IST

www.24taas.com, आशीष आम्बाडे, चंद्रपूर

 

एकीकडे चंद्रपूर जिल्हयातील २५ वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात शिकारी टोळ्यांना कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली जाण्याची चर्चा असतानाच चंद्रपुरात पुन्हा एका वाघाची शिकार झाली आहे. अलर्ट जारी करुनही वाघाची शिकार झाल्यानं वनखात्याच्या क्षमेतवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. शिकारीप्रश्नी माहिती देणाऱ्या वनखात्यानं एक लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

 

२५ वाघांच्या शिकारीची सुपारी. एरव्ही मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एखाद्याचा काटा काढण्यासाठी घेतली जाणारी सुपारी वाघांच्या हत्येसाठीही घेतल्याच्या चर्चेनं वन्यजीवप्रेमी अक्षरश हादरुन गेले. मध्यप्रदेशातल्या कटनी येथील बहेलीया या शिकारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या टोळीनं हि सुपारी घेतल्याच्या माहितीनंतर वनखात्यानं राज्यात अलर्ट जारी केला. तरीही चंद्रपूर शहरालगत असलेल्या बोर्डा जंगलात विजेचा शॉक देऊन पट्टेदार वाघाची शिकार झाली आहे. शिकाऱ्यांनी वाघाचे मुंडके आणि चारही पाय कापून नेले. हे काम अत्यंत क्रूर पद्धतीने आणि थंड डोक्यानं करण्यात आलं आहे.

 

वरिष्ठ वनाधिकारी आणि वन्यजीव बचाव पथकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिकाऱ्यांचा मागोवा काढण्यासाठी वन विभागानं प्रशिक्षित श्वानांचीही मदत घेतली. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांत सध्या वन विभागाचे नव्हे तर शिकाऱ्यांचे राज्य असल्याची स्थिती आहे. गेल्या पाच महिन्यांत पाच वाघांचा मृत्यू झाला असून त्यातील ४ वाघांची हत्या शिकाऱ्यांनी केली आहे.

 

शिकारी टोळ्यांच्या मुसक्या बांधून हे क्षेत्र वाघांच्या अधिवासासाठी अधिक संरक्षित करण्यासाठी भक्कम प्रयत्नांची गरज असल्याचं या घटनेनं सिद्ध केलं आहे. त्यामुळं आता उरलेलं वाघ वाचविण्याचं आव्हान वनखात्यापुढं आहे.