चंद्रपूर जनतेच्या संतापाला सामोरे गेले पालकमंत्री

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद आता पेटू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत डावलण्यात आल्यानं शहरात संताप व्यक्त केला जातो आहे.

Updated: Jan 8, 2012, 05:14 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर

 

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद आता पेटू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत डावलण्यात आल्यानं शहरात संताप व्यक्त केला जातो आहे. या संतापाचा सामना करावा लागला तो पालकमंत्री संजय देवतळे यांना. राज्य शासनानं नुकतीच ४ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा केली. मात्र या यादीत चंद्रपूरचं नाव नाही.

 

गेली २५ वर्षं चंद्रपूर जिल्हा प्रदूषण आणि गंभीर आजारांचं केंद्र झालेलं असतानाही चंद्रपूरला वैद्यकीय सुविधा डावलण्यात आल्यात. जिल्ह्यातल्या कोणत्याही आमदाराने खासदाराने साधा निषेधही नोंदवला नाही. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ९ जानेवारीला शैक्षणिक संस्था बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

 

 

मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा झाली तेव्हा आपण नागपूरात एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्यी सारवासारव पालकमंत्र्यांनी केली.कारणं काहीही असोत मात्र चंद्रपूरकरांचा संताप पाहता शासकीय महाविद्यालयाचा मुद्दा सरकारच्या अडचणी वाढवू शकतो.