www.24taas.com, जळगाव
शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज जळगाव बंदची हाक दिलीय. जैन यांना पोलिसांनी दंडुकेशाहीच्या जोरावर अटक केल्याचा आरोप जैन समर्थकांसह शिवसेनेनं केला आहे. त्याच्या निषेधार्थ आजचा हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमधून शाळा, कॉलेज तसच अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसच सुरेश जैन यांनी अन्नत्याग केला असल्याचं जैन यांचे पुत्र राजेश जैन यांनी सांगितलं आहे.
दरम्यान सुरेशदादा जैन यांना काल मध्यरात्री अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री धरणगाव येथे सापळा रचून जैन यांना अटक केली. सुरेशदादा जैन इंदोरला पळून जाण्याच्या तयारीत होते. या प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.