बीडमध्ये चोर मुजोर, पोलीस कमजोर

Updated: Nov 21, 2011, 08:38 AM IST

झी २४ तास वेब टीम, बीड

 

बीडमध्ये चोरांनी पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातल्या बालाघाट परिसरात रात्रीच्या वेळेस पेट्रोलींग करत असताना चोरांनी लाठ्या काठ्या आणि दगडांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झालेत.

 

चार ते पाच चोरांनी दुकानं फोडण्याचा कट आखला  होता. पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागताच त्यांनी तात्काळ कारवाईला सुरूवात केली. मात्र, चोरट्यांनीच पोलिसांवर अचानक हल्ला  चढवला. पोलिसांनी चोरांवर गोळीबार केला. मात्र, चोरांनीही पोलिसांवर दगडफेक केली. त्यातच चोरांनी संधी साधत पोलिसांचीच पिस्तुल त्यांच्या डोक्याला लावून तिथून पळ काढला. तब्बल दोन तास पोलीस आणि चोरांमध्ये धुमश्चक्री सुरू होती.

 

गेल्या पंधरा दिवसांत चोरीची ही पाचवी घटना आहे. काही दिवसांपूर्वी चोरांनी पोलिसीच्याच घरात डल्ला मारला होता. त्यामुळे बीडमध्ये चोर मुजोर आणि पोलीस कमजोर झाल्याचं दिसून येत आहे.