वाघुर पाणी घोटाळा : गुलाबराव देवकरही अडचणीत

जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.

Updated: Jul 29, 2012, 08:51 PM IST

विकास भदाणे, www.24taas.com, जळगाव

जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.

जळगावमधला 29 कोटी 59 लाखांचा घरकुल घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला तो शिवसेना आमदार सुरेश जैन आणि पहिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अटकेमुळं. याप्रकरणी जैन- देवकरांना जामीन मिळाला खरा मात्र या दोघांवर पुन्हा अटकेची टांगती तलवार लटकलीय. वाघूर पाणीपुरवठा योजनेत 42 कोटी 62 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आमदार सुरेश जैन आणि तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2006 य़ा काळात हा अपहार झाल्याची तक्रार विद्यमान नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी केली होती.

42 कोटींच्या या घोटाळ्यात जैन आणि देवकरांसह 10 वर्षांच्या कालावधीतल्या तत्कालीन 12 नगराध्यक्ष, नगरसेवक  आणि मुख्याधिका-यांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं या घोटाळ्यात सर्वांचेच हात ओले झाल्याची जोरदार चर्चा आहे.

जळगावमधील घरकुल घोटाळा गाजत असतानाच आता आणखी एक कोट्यवधींचा घोटाळा उघड झालाय. मात्र घरकुल घोटाळ्यासारखचं आताही चौकशी, अटक आणि जामीन असाच त्रिसुत्री कार्यक्रम पार पडणार की क़डक कारवाई होणार याचीच उत्सुकता लागलीय.